भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ल्यामागे यंत्रणा आहे का ? आदित्य ठाकरेंचा सवाल
राज्यात राजकीय गोंधळ सुरु असताना, सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरु आहे. मोदी यांची नक्कल केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याच दरम्यान, आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ला झाल्याची घटना काल (मंगळवारी) घडली आहे. त्यामुळे एकच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यावरच आताशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
जाधव यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ल्यामागे यंत्रणा आहे का ? त्याला राजकीय पाठबळ मिळाले का याबाबत तपास करावा, सरकार घटनाबाह्य असून यंत्रणेचा दुरुपयोग केला जात असल्याची टीकाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.
पुढे ते म्हणाले की, “भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला झाला आहे. परंतु माझ्या समोर आणखी एक मुद्दा आला आहे की, काल रात्री अकरा-साडेअकरा वाजेच्या आसपास तिथली पोलीस सुरक्षा, स्थानिक सुरक्षा काढली गेली आणि बरोबर एक-दोन तासानंतर हा हल्ला झाला आहे. इथे कुठे काही या हल्ल्याला राजकीय पाठबळ आहे का ? कुठंतरी यंत्रणा यामागे आहे का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण हे भ्याड हल्ले आहेत. राजकीय जीवनात आरोप-प्रत्यारोप, टीका, टिप्पणी होत असते पण असे कोणी नसताना घरावर हल्ले, पोलीस संरक्षण काढून घेणं. काल राजन विचारेंची सुरक्षाही कमी केली आहे. हे कुठंतरी यंत्रणेचा गैरफायदा घेणे, दुरुपयोग करणे हे समोर येत आहे.” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.