गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणे म्हणजेच...; आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र
मुंबई : राज्यात वादग्रस्त विधानांची मालिक सुरु झाली असून शिवप्रताप दिनी भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी मोठे विधान केले आहे. यावेळी लोढा यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील एका प्रसंगाची तुलना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली आहे. यावरून आता मोठा निर्माण झाला असून राजकीय वर्तुळातून पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मंगल प्रभात लोढांवर टीकास्त्र सोडले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्र द्वेष सुरू आहे. एकीकडे यांना सगळ्यांना गद्दार म्हणून ओळखलं जातं. आणि त्यांच्याच प्रसंगाची तुलना ही छत्रपती शिवाजी महाराजांची केली जाते. म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्राला कमी लेखण्याचा हा प्रयत्न दिसत आहे. गद्दारांची तुलना महाराजांबरोबर करण्याचा हा प्लॅन आहे. आणि त्यामुळेच अशा पद्धतीची वक्तव्य येतात, असं मला असं वाटतं, असे त्यांनी म्हंटले आहे.
राज्यपाल ज्या पद्धतीने बोलले आहेत. त्यांना खोके सरकारने परत पाठवलं पाहिजे. परंतु, त्याबद्दल कोणीही भूमिका घेताना दिसत नाहीये. अधिवेशनात राज्यपालांच्या वक्तव्याचे पडसाद उमटतील, असा इशारा त्यांनी आदित्य ठाकरेंनी दिला आहे.
मंगळवारी परदेशी कंपनीने करार केला. त्याच कंपनीबरोबर आम्ही दावसमध्ये एमओयू साइन केला होता. मग, आता पाच महिन्यानंतर त्यांना या कराराच्या पुढची प्रक्रिया पार पाडावी लागली. म्हणजे याचा अर्थ इथले उद्योगमंत्री काम करतात की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्रातील प्रकल्प इकडे तिकडे जातात. पण, उद्योग मंत्री काय काम करतात हे दिसत नाही. ते कुठेही नसतात. महाराष्ट्राला उद्योग मंत्री काय करतात हा प्रश्न पडलेला आहे. त्यांना मी या खात्यामध्ये काम करताना पाहिलं नाही, अशी टीका त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर केली आहे.
ज्यावेळेस कोरोनाची लाट आली होती. त्यावेळेस आम्ही रोज ब्रीफिंग करायचं, माहिती द्यायचे. आणि आता गोवरची साथ आली असताना सुद्धा आरोग्य मंत्री काय कशा पद्धतीने काम करतात हे दिसत नाही आणि महाराष्ट्राला या संदर्भात तपशीलही दिला नाही, असा निशाणा त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर साधला आहे.