संजय राऊत यांना जामीन मिळताच आदित्य ठाकरे म्हणाले, राऊत डरपोक...
मागील अनेक महिन्यांपासून संजय राऊत हे गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात कोठडीत होते. कोर्टाकडून अनेक वेळा त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती. मात्र, आता राऊत यांना अखेर पीएमएल कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 100 दिवसानंतर संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. त्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) यांच्या गोटात जल्लोषाचे वातावरण आहे. त्यावरच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देतांना मात्र त्यांनी विरोधकांना धारेवर धरले आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच, बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. उगाचच नाव लावून फिरत नाहीत, मुखवटे लावून फिरत नाहीत. त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं पण त्यांनी गद्दारी केली नाही. ते पळून गेले नाहीत. ते डरपोक नाहीत हे लोकांसमोर आलं आहे. जे डरपोक होते ते पळून गेले. मी आता तेच सांगितलं जे कोणी सत्तेविरोधात आवाज उठवतात, सरकारविरोधात बोललं की दबावतंत्र वापरलं जातं. आज राजकीय लोकांवर कारवाई होते, उद्या ज्यांना ते एचएमव्ही बोलतात त्यांच्यावरही कारवाई होईल ही देशासाठी धोक्याची घंटा आहे." असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.