आदित्यराजाच्या कृपेनं वरुणराजानं टेंडरचा पाऊस पाडला; शिंदेंच्या टीकेला ठाकरेंचे प्रत्युत्तर, म्हणाले...
मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य राजाच्या कृपेनं वरुण राजानं अक्षरश: टेंडरचा पाऊस पाडला, असा टोलाही आदित्य ठाकरेंना लगावला होता. यावर आज आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री भाजपची स्क्रिप्ट वापरत आहेत त्यांची तेवढीच पोच आहे तेवढंच करतायेत, असा पलटवार त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, स्ट्रीट फर्निचरबाबत दोन आठवड्यांपूर्वी लोकायुक्तांना पत्र पाठवले. आज त्यांच उत्तर आलं आहे. मला आणि आयुक्तांना बोलावलं आहे. अपेक्षा आहे आयुक्त येतील. आयुक्तांना पत्र लिहिलं पण त्यांचं उत्तर अद्याप आले नाही. रस्त्यांची यादी दिली होती. ५० रस्त्यांच्या यादी दिली होती पण पुढे काय झाले. आयुक्तांनी यादी द्यावी आम्ही त्यांच्या कामाचा आढावा घेऊ. पण त्यांच्यात हिम्मत नाही. अजून एक वर्ष गेलं तरी काही होणार नाही. याला घटनाबाह्य मुख्यमंत्री जबाबदार आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
फक्त लुट करतायेत याच दुःख आहे. दिल्लीश्वरांच्या आदेशाने हे सुरू आहे. MTHLचं कामं ८५ टक्के पूर्ण झालं होतं. पण, दीड महिना उशिरा केले. स्वतः च्या स्वार्थासाठी दिघा स्थानक ८ महिने झाले तयार आहे. पण, व्हीआयपीचा वेळ मिळाला नाही. गेल्या १ वर्षात १ एफडीआयचा पैसा राज्यात आला नाही. आज MTHL सूरू करा. दिघा लाईन सुरू करा, असे त्यांनी म्हंटले आहे.
खासदार निलंबनाबाबत आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. देश हुकूमशाहीकडे वळतो आहे. निवडणूक आयोगाच्या अध्यक्षपदाची निवडीत देखील आता सीजेआय नाही आहे. सरकार स्टेटमेंट देऊ शकलं असतं. संसद हल्ल्याचं समर्थन नाही. पण सिक्युरिटी ब्रिच कशी झाली? ज्यांच्या पासावर ते आले त्यांची साधी चौकशीही नाही. नोकऱ्या नाहीत म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं त्यांचा देखील गांभीर्याने विचार करायला हवा, असे आदित्य ठाकरेंनी म्हंटले आहे.