गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं हा महाराष्ट्र द्वेष : आदित्य ठाकरे
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीचं प्रकरण ताज असतानाच भाजपचे आमदार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गुवाहाटीतील बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेशी केली. या प्रकरणावरून आता पुन्हा एकदा विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावर आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया आली आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, शिवरायांशी तुलना करणे म्हणजे हिंदुत्व नव्हे, हा तर महाराष्ट्राचा द्वेष आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं हे हिंदुत्व नाही. हा महाराष्ट्र द्वेष आहे! ‘महाराष्ट्राचं खच्चीकरण’ हेच या खोके सरकारचं ध्येय आहे!’असे आदित्य ठाकरे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
मंगलप्रभात लोढा नेमकं काय म्हणाले होते?
“छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगाजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं. पण, शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी तिकडून ( महाविकास आघाडी ) बाहेर पडले,” असे मंगलप्रभात लोढा म्हणाले होते.
अजित पवारांची प्रतिक्रिया
मंगलप्रभात लोढांनी एकनाथ शिंदे यांची तुलना शिवाजी महाराजांशी केल्यानंतर राष्ट्रवादीकडूनही प्रतिक्रिया आली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी या भाष्यावर नाराजी व्यक्त केली आहे. “आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या ठिकाणी ठेवलं होतं, त्याची आणि एकनाथ शिंदेंच्या घटनेची तुलनाच होऊ शकत नाही. एकनाथ शिंदेंना कुणी बंदी केलं होतं? एकनाथ शिंदे हे सभागृहात गटनेते होते. २०१४ मध्ये त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं. त्यांच्यावरच सगळी जबाबदारी होती,” असं अजित पवार म्हणालेत.