वऱ्हाड निघालं दावोसला; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
मुंबई : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक 15 ते 19 जानेवारी दरम्यान दावोस येथे होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी शिष्टमंडळासोबत दावोसला जाणार असल्याचे जाहीर केले होते. यावरुन आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. वऱ्हाड निघालं लंडनला तसं हे वऱ्हाड निघालं दावोसला, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, आज गोड गोड बोलायचं दिवस आहे, पण थोडा सत्य बोलायचं दिवस आहे. मागील वर्षी मुख्यमंत्री 28 तासांसाठी दावोस दौऱ्यावर होते. मागच्या दौऱ्यावर 40 कोटी खर्च झाले होते. आता पुन्हा मुख्यमंत्री दावोसला जात आहेत आणि त्यांच्यासोबत 50 लोक जात आहेत. ही मंडळी कोण आहेत कशासाठी जात आहेत ते माहिती नाही. पण जी मंडळी जातात तेव्हा एमईए आणि वित्त खाते यांची परवानगी घ्यावी लागते. आम्ही सुद्धा परवानगी घेतली होती. यावेळी यांनी फक्त 10 लोकांची परवानगी घेतली आहे. पण, 50 लोकांना नेत आहेत त्यांची परवानगी घेतली का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
माझ्या भीतीने त्यांनी चार्टर्ड प्लेन घेतलं नाही. त्यांनी 20 कोटी वर खर्च झाला नाही पाहिजे असं म्हटले आहे. यामध्ये एक खासदार आणि माजी खासदार आहेत. त्यांचा रोल अद्याप नाही सांगितलं आहे. पूर्वी ते सुरतला घेऊन जात होते आता बहुतेक ते दावोसला नेत आहेत. सुट्टी मारायला मज्जा मारायला जात आहेत की काम करायला जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
प्रत्येक खात्याच्या एकाला नेऊ शकतात सगळ्यांची काय गरज आहे. केंद्र सरकारचा काही अंकुश राहिला आहे का नाही? एमईएला मी विचारू इच्छितो एवढ्या लोकांना जाण्याची काय गरज आहे? हे दोन दलालांना सुद्धा घेऊन जात आहेत. यामध्ये ज्यांना परवानगी देण्यात आली आहे ते त्यांच्या सोबत बायकोला घेऊन जाऊ शकतात येथे मुलांना सुद्धा घेऊन जाताय. गरज आहे का? सही मुख्यमंत्री करणार आहेत. महाराष्ट्र सरकारचा पैसा यामध्ये जातोय म्हणजे आपला सगळ्यांचे पैसे जाताय. वऱ्हाड निघालला लंडनला तसा हे वऱ्हाड निघाला दाओसला, असा टोला आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.
दरम्यान, महालक्ष्मी रेसकोर्सवरुन आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ३ ते ४ रेसकोर्स च्या क्लब मधील सदस्य हे मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करत आहेत. २२६ एकर जागा यामध्ये विभागली जाणार आहे. काही एकर जागा ही रेसकोर्ससाठी आणि इतर १२० एकर जागा थीम पार्कसाठी राखीव ठेवली आहे आणि बाकी जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. घोड्यांच्या तबल्यासाठी १०० कोटी रुपये का खर्च केले जातं आहेत? माझा आवाहन आहे की भाजपने रेसकोर्स आणि दाओस दौऱ्यावर त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी, असेही त्यांनी म्हंटले आहे.