बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा चालवला तर रिअॅक्शन येणारच : आदित्य ठाकरे
मुंबई : सांताक्रुज बीएमसी वॉर्ड ऑफिसमध्ये ठाकरे गटाच्या शिष्टमंडळातील सदस्यांनी बीएमसी अधिकाऱ्यांना मारहाण केली होती. यावर शिंदे गट-भाजपने ठाकरे गटावर टीका केली होती. या टीकेला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेबांच्या फोटोवर कोणी हातोडा चालवला तर त्यांच्या चाहत्यांकडून रिअॅक्शन येऊ शकते, असे आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, अनधिकृत म्हणून जी शाखा महापालिकेने तोडली त्या शाखेत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता. त्या शाखेवर गद्दारांनी बुलडोझर चढवला. राज्यात कुठेही शिवाजी महाराजांचा फोटोवर अथवा बाळासाहेबांच्या फोटोवर कोणी हातोडा चालवला तर तर त्यांचे चाहते आहेत त्यांच्याकडून रिअॅक्शन येऊ शकते, असे त्यांनी म्हंटले आहे. तर, गृहमंत्र्यांनी आधी माहिममध्ये यावं तिथल्या गद्दाराने जो गोळीबार केला आणि त्याच्यावर कारवाई करावी आणि मग बोलावे, असा टोलादेखील देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.
दरम्यान, ठाकरे गटाने आज सांताक्रुज बीएमसी वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढला होता. यावेळी ठाकरे गटाचे शिष्टमंडळ आमदार अनिल परब यांच्यासोबत बीएमसी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी आले होते. या चर्चेवेळी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळातील सदस्यांनी बीएमसी अधिकाऱ्यांना मारहाण केली. अनिल परब यांच्यासमोरच चोप देण्यात आला आहे. यासंदर्भात बीएमसी अधिकाऱ्याने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचीही माहिती मिळतेय.