हे सरकार केवळ कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरचं राहिलंय, जनतेचे नाही; आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र
सचिन बडे | छत्रपती संभाजीनगर : आदित्य ठाकरे आज मराठवाडा दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागले आहे. मराठवाड्यातील हा दौरा फक्त शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रश्न समजून घेण्यासाठी आहे आणि सरकारकडे मागण्यासाठी आहे. हे सरकार केवळ कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरचं राहिलेलं आहे, जनतेचे राहिलेलं नाही, असा निशाणा आदित्य ठाकरेंनी साधला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये होणारा कोट्यवधींचा खर्च होऊन जर का मराठवाड्याला काही मिळत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. मात्र असाच खर्च गुवाहटी या ठिकाणी केला आहे तो खर्च कुठून आला हा प्रश्न आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घोषणा झाली तरी त्याची अंमलबजावणी होणार आहे का? काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली होती, पिकांचे नुकसान झालं होतं. मात्र, अद्यापही कुठल्याही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही. त्यामुळे किती खोटी आश्वासने हे खोके सरकार देणार आहे, असा प्रश्नदेखील त्यांनी विचारला आहे.
उद्या मराठवाड्यावर मंत्रिमंडळाची बैठक आहे. या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मराठवाड्याला काय मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरलं, असेही त्यांनी म्हंटले आहे.