...तर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी कोलांट्या उड्या मारत उद्योग गुजरातला पाठवलं असते; आदित्य ठाकरेंचा टोला
मुंबई : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज एक दिवसीय भेटीदरम्यान व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 च्या संदर्भात मुंबईतील आघाडीच्या उद्योगांशी संवाद साधला. यावरुन आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. गुजरातला पाठवतात रोजगार आणि मिंधे सरकार रोज गार, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, गुजरातचे मुख्यमंत्री आज मुंबईत आहेत. 'व्हायब्रंट गुजरात' रोड शो साठी. गुजरातमध्ये उद्योगधंदे वाढावेत ह्यासाठी हा खटाटोप. पण त्यांना एवढी मेहनत करायची गरजच काय? फक्त एक फोन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना केला असता, तर त्यांनी आनंदाने कोलांट्या उड्या मारत इकडचे उद्योग तिथे पाठवायच्या कार्यक्रमाला अधिक वेग दिला असता, असा निशाणा त्यांनी शिंदे-फडणवीसांवर साधला आहे.
वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, एयरबस-टाटा, ४० गद्दार, सगळंच तर पाठवलं तिथे अजून काय पाहिजे? असा खोचक सवालही त्यांनी केला आहे. 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' कार्यक्रम मात्र होऊ नाही शकला, कारण ह्या खोके सरकारचं मॅग्नेट स्वतःसाठी खोके खेचतंय आणि उद्योग-रोजगार तिथे पाठवतंय, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केला आहे.
दरम्यान, अंबादास दानवे यांनीही व्हायब्रंट गुजरातवरुन सरकारवर घणाघात केला आहे. गेल्या काही काळात महाराष्ट्रातले मोठे उद्योग गुजरातला गेले आहेत. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती की, येणाऱ्या काळात यापेक्षाही मोठे उद्योग हे महाराष्ट्रात येणार आहेत. अद्यापही ते आलेले नाहीत. महाराष्ट्राच्या तोंडचा घास गुजरातच्या तोंडात गेल्याची टीका दानवेंनी केली आहे.