मनसेचा ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव? अभिजीत पानसे म्हणाले...
मुंबई : अजित पवारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांनी एकत्र यावे, असा सूर कार्यकर्त्यांमधून उमटत आहे. अशातच, मनसे नेते अभिजीत पानसे यांनी संजय राऊतांची भेट घेतल्याचे वृत्त होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याबाबत अभिजीत पानसे यांनी प्रतिक्रिया देत या चर्चांना फेटाळले आहे.
मनसे नेते अभिजीत पानसे यांनी संजय राऊत यांची सामना कार्यालयात भेट घेतली. या भेटीत युतीची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. अभिजीत पानसे-संजय राऊतांनी भांडुप ते प्रभादेवी कारमधून एकत्र प्रवास केल्याचेही समजत आहे. अभिजीत पानसे यांच्या भेटीनंतर संजय राऊत मातोश्रीवर पोहोचले आहेत. तर, अभिजीत पानसे यांनी घेऊन आलेल्या प्रस्तावावर प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याबाबत बोलताना अभिजीत पानसे म्हणाले की, माझी आणि संजय राऊत यांची सुरुवातीपासून मैत्री आहे. आमच्यात चांगले सबंध आहेत. माझं वैयक्तिक काम होतं. त्या माझ्या वैयक्तिक कामासाठी मी संजय राऊत यांना भेटायला आलो होतो, असे त्यांनी सांगितले.
आमच्यात राजकीय विषयांवर चर्चा झाली. मात्र, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं की नाही ते पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. आमचं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रात सध्या जे घडतंय त्यामुळे आता जनतेने राज ठाकरे यांनाच पाठिंबा द्यावा, असे त्यांनी म्हंटले आहे.