Maharashtra Political Crisis : काही जण गणपती पाण्यामध्ये ठेवून प्रार्थना करू लागले; सत्तारांचा ठाकरे गटावर निशाणा
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय उद्याच निकाल देणार आहे. यामुळे राजकीय घडामोडींना आता वेग आला असून सत्ताधारी-विरोधकांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे. अशातच, शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया देताना निकाल आमच्या बाजूनेच लागणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. काही जण गणपती पाण्यामध्ये ठेवून प्रार्थना करू लागले, असा निशाणाही सत्तारांनी ठाकरे गटावर साधला आहे.
उद्याचा निकालाचे आम्ही स्वागत करु. निकाल आमच्यासारखा लागणार असल्याची आमची अपेक्षा आहे. कायद्याने ते नियमाप्रमाणे आहे. निकाल आमच्या विरोधात गेला तरी आम्ही त्याचे हसत खेळत स्वागत करू. तरी उद्याचा निकाल आमच्या बाजूने येईल, असेही अब्दुल सत्तार यांनी म्हंटले आहे.
काही जण गणपती पाण्यामध्ये ठेवून काहीतरी प्रार्थना करू लागले. आमचा पक्ष चंद्रकांत खैरेंपेक्षा जास्त हिंदुत्ववादी आहे. चंद्रकांत खैरे सुद्धा शिवसेनेचा मुख्यमंत्री बनावा यासाठी पूजेला बसले असतील, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तान आज जळत आहे. कारण ते संविधानानुसार सुरु नाही. सरकारे पाडली जाताहेत. न्यायव्यवस्था विकली गेली आहे. हे चित्र या देशामध्ये असू नये. यासाठी उद्याचा सर्वोच न्यायालयाचा निकाल अत्यंत महत्वाचा आहे. या देशाचा स्वातंत्र्यासाठी हजारो क्रांतिवीरांनी बलिदान दिले आहे. त्यामध्येच आंबेडकरांनी दिलेले संविधान सुध्दा आहे. त्याच्या रक्षणासंदर्भातील निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल. म्हणून आम्ही आशावादी आहोत, असे संजय राऊत म्हणाले आहेत.