हे कोणी केलंय चांगलं माहितीयं, पण अहंकार...; राहुल कनाल यांचं सूचक ट्विट
मुंबई : शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची गळती थांबण्याचे नाव घेत नाही. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. शनिवारी 1 जुलै रोजी राहुल कनाल पक्षप्रवेश करणार असल्याचे समजते आहे. यावर राहुल कनाल यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच, वांद्रे पश्चिम विधानसभेतील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीनंतर राहुल कनाल यांनी ट्विटरवरुन आपली नाराजी व्यक्त केली आहे.
दुःख होतंय! हे कोणी केले हे चांगले माहित आहे पण ज्यांनी तुमच्यासाठी काम केले आहे अशा लोकांना न ऐकता काढून टाकणे म्हणजे अहंकार आहे आणि तुम्ही मला हटवू शकलात. पण, त्या लोकांना नाही ज्यांनी रात्रंदिवस काम केले. तरीही चलो अच्छा है सबको पता चले की अहंकार और अहंकार क्या होता है, अशा शब्दात राहुल कनाल यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
तर, जय महाराष्ट्र!!! ज्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस काम केलं. त्या कार्यकर्त्यांना माझ्यामुळे सामना करावा लागत आहे. यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. ही फक्त सुरुवात आहे. तुम्ही त्याची सुरुवात केली आहे. धन्यवाद, असेही राहुल कनाल म्हणाले आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षी राहुल कनल यांच्या घरावर सीबीआयचा छापा पडल्यापासून राहुल कनाल हे शिवसेनेत फारसे सक्रियही नव्हते. मागील एक वर्षाच्या काळात ते शिवसेना भवन किंवा मातोश्रीवर देखील फिरकले नाहीत. काही दिवसांपुर्वीच त्यांनी व्हॉटसअप ग्रुपमधून एक्झिट केले होते. आता 1 जुलै रोजी ते आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.