आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल! राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन
मुंबई : राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा येथे एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. भाजप पदाधिकारी महिलेच्या आरोपानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविरोधात राष्ट्रवादीकडून निदर्शने करण्यात येत आहेत.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांमी रास्ता रोको, रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तर, ठाण्यातही तणाव निर्माण झाला असून आव्हाड यांच्या विवियाना मॉलजवळच्या घरासमोर काही ठिकाणी रस्त्यावर जळलेले टायर टाकून वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी कार्यकर्त्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.
दरम्यान, विनयभंगाच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४, मी ह्या पोलिसी अत्याचारा विरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.