केंद्राच्या योजनेत कन्येला 10 कोटीचं अनुदान; विजयकुमार गावितांचे स्पष्टीकरण, म्हणाले...
नाशिक : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित या केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्या योजनेच्या लाभार्थी ठरल्या असून त्यांना योजनेसाठी 10 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करत ही बाब उघड केली असून विरोधकांनी आता याप्रकरणी गावित आणि भाजपाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. यावर अखेर विजकुमार गावित यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
फूड प्रोसेसिंगची ही योजना आहे. २०१९ साली माझ्या कन्येने अर्ज भरला होता. हे सगळं ओपन आहे. अर्ज भरल्यानंतर मुलाखत होते. हे ज्यावेळी झाले, तेव्हा मी मंत्री पण नव्हतो. हे कुणालाही भेटू शकते. मेरिटवर माझ्या कन्येला हे मिळालं आहे. त्यांना पहिला हप्ता मिळाला असून, त्याच्यावर काम सुरू आहे. त्यांना अजून १० कोटी रुपये मिळाले नाही, असा खुलासा विजयकुमार गावित यांनी केला.
तसेच, जनता ही आपल्याला निवडून देत असते. चांगलं काम असेल, तर जनता निवडून देते. शासनाची योजना ही सर्वांना असते, पुढारी असो की, नसो. योजना कुणीही असो, पात्र असल्यास त्याला लाभ मिळेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या किसान संपदा योजनेअंतर्गत केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने कृषी प्रक्रिया क्लस्टर प्रकल्पांना अनुदान दिले आहे. या योजनेखाली महाराष्ट्रातील 13 कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. यात मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित यांच्या व्हॅली इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट या कंपनीचा समावेश असल्याचे सचिन सावंत यांनी म्हंटले आहे. एका मंत्र्याची मुलगी शासकीय योजनेची लाभार्थी कशी? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे