Sangli : सांगलीतील शिराळ्यात पुन्हा बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सांगली: जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणावती येथील नागरी वसाहतीमध्ये दोन दिवसांपूर्वी येथील नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पुन्हा तोच बिबट्या येथील बस स्थानक परिसरात संध्याकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांना दिसून आला.
काही दिवसांपूर्वी या गावातील अमीन गुड्डापुरे यांच्या घराजवळील पाळीव कुत्र्याला बिबट्याने भक्ष केले होते. त्यावेळी येथील सीसीटीव्ही कॅमेरात बिबट्या कैद झाला होता. त्यामुळे वसाहतीत बिबट्याचं वास्तव्य असल्याचे सिद्ध झाले होते. आता तर वारंवार या बिबट्याचे नागरिकांना दर्शन होऊ लागले आहे. परिसरातील भटकी कुत्रीही गायब झाली आहेत.
वारणावती वसाहत सध्या निर्मनुष्य झाली आहे. मोजकेच कर्मचारी येथे वास्तव्यास असल्यामुळे वसाहतीची दुरावस्था झाली आहे. झाडाझुडपांच साम्राज्य वाढले आहे. बिबट्याला तसेच वन्य प्राण्यांना लपण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे वारंवार येथे गवे, बिबटे यांचे दर्शन होऊ लागले आहे. संध्याकाळच्या बस स्थानक परिसरात परवाचाच बिबट्या पुन्हा नागरिकांच्या निदर्शनास आला आहे. त्यामुळे नागरिकांना आता परिसरात वावरणे मुश्किल झाले आहे. वन विभागाने याकडे लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज नागरिकांनी वर्तवली आहे