Lata Mangeshkar Passes Away |राज्यात आज सार्वजनिक सुट्टी ; बँका, केंद्र सरकारी कार्यालये, शाळा बंद
Lata Mangeshkar Passes Away : भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले. यांच्या निधनाचा दुखवटा म्हणून राज्य सरकारने आज (सोमवार) ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
यासाठी काढण्यात आलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे."
केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलेला असल्याने या काळात कोणतेही सरकारी कार्यक्रम होणार नाहीत. ही सुट्टी राज्य सरकारला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार परक्राम्य संलेख अधिनियमानुसार जाहीर करण्यात आलेली असल्याने सर्व सरकारी कार्यालये, शाळा, केंद्र सरकारची राज्यातील कार्यालये, राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा बंद राहतील.