कोल्हापुरात महागाईच्या विरोधात दंडवत आंदोलन, कामगार संघ आक्रमक
महागाईच्या विरोधात अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ आक्रमक झाला आहे. यासाठी त्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दंडवत घालून लक्षवेधी आंदोलन केले. त्यासोबतच केंद्र आणि राज्य सरकार हे दोन्ही सरकार महागाईला जबाबदार असल्याचा आरोप केलाय. या लक्षवेधी आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ गर्दी होती.
सध्या देशभरात महागाईने उच्चांक गाठला आहे. अशातच केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल डिझेल घरगुती गॅस ही दरवाढ करत जीवनावश्यक वस्तू असणाऱ्या खाद्य तेलाचे दर देखील गगनाला भिडले आहेत. अनेक वेळा केंद्र सरकार आणि राज्य सरकारला निवेदन देऊनही याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.
त्यामुळे अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने दंडवत घालून आंदोलन करण्यात आलंय. तसेच केंद्र आणि राज्य सरकारला सद्बुद्धी द्यावी. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोटोला पंच-आरती देखील करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.