Kolhapur District Bank Election Results | नागरी बँक, पतसंस्था गटात आमदार प्रकाश आवाडे पराभूत
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून काही निकाल हाती आले आहेत. येथे एकूण 21 जागांपैकी 6 जागांवर सत्ताधारी गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. (KDCC Bank Election 2022) उरलेल्या 15 जागांसाठी ही निवडणूक लागली होती. (KDCC Bank Voting) त्यामुळे आता पंधरा जागांवर कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजप आघाडी विरुद्ध शिवसेना अशी चुरस आहे. नागरी बँका आणि पतसंस्था गटात प्रा. अर्जुन आबिटकर यांनी विजय मिळवला. बँकेचे विद्यमान संचालक अनिल पाटील, आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) पराभूत झाल्याने धक्कादायक विजयाची नोंद झाली आहे.
या गटात विद्यमान संचालक अनिल पाटील, आमदार प्रकाश आवाडे, प्रा. अर्जुन आबिटकर अशी तिरंगी लढत झाली. १२२१ मतदारांपैकी आमदार प्रकाश आवाडे यांना ४६१ मते मिळाली. प्रा. अर्जुन आबिटकरांना ६१४ तर अनिल पाटील यांना १०६ मते मिळाली. आवाडे यांना सत्तारुढ आघाडीत स्थान दिले होते. तर प्रा. आबिटकर हे विरोधी आघाडीतून लढत होते.
आबिटकर जिल्हा परिषद सदस्य असून आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू आहेत. अनिल पाटील यांनी मागील निवडणूक भाजपकडून लढवली होती. यावेळी त्यांनी सत्तारुढ आघाडीतून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती, पण आवाडे यांच्या एन्ट्रीमुळे अनिल पाटील यांचा पत्ता कट झाला होता. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. त्यांच्या उमेदवारीचा फटकाही काही प्रमाणात आवाडे यांना बसल्याचे दिसत आहे.
- नागरी बँक, पतसंस्था गटात आमदार प्रकाश आवाडे पराभूत. जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आबिटकर विजयी
- आघाडीच्या नेत्यांनी रचलेला चक्रव्यूह शिवसेनेनं भेदला आहे; खासदार संजय मंडलिक यांची पहिली प्रतिक्रिया
- शिवसेना खासदार संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांचा सत्ताधाऱ्यांना धक्का
- गडहिंग्लज विकास सेवा संस्था गटात संतोष पाटील विजयी
- भुदरगड विकास संस्था गटात रणजीत पाटील विजयी
- शिरोळवर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचाच झेंडा
- राधानगरी विकास सेवा संस्था गटात रणजित पाटील विजयी. रणजित पाटील हे माजी आमदार के पी पाटील यांचे चिरंजीव
- शाहुवाडी विकास सेवा संस्था गटात रणवीर गायकवाड यांनी केला विद्यमान संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर यांचा पराभव
- आजरा सेवा संस्था गटात विद्यमान संचालक अशोक चराटी पराभूत. सुधीर देसाई विजयी
- भाजप-काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडी समोर शिवसेनेचं आव्हान
- बँकेतील एकूण २१ जागांपैकी १५ जागांवर झाली होती निवडणूक.
- सकाळी आठ वाजता झाली मतमोजणीला सुरुवात कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीची मतमोजणी
- कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू