राऊतानंतर किरीट सोमय्यांचा नंबर? 'त्या'प्रकरणी उच्च न्यायालयाकडून जामीन रद्द
मुंबई : आयएनएस विक्रांत निधीच्या गैरवापर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन रद्द केला आहे. यामुळे यामुळे किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार असून डोक्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्यांना समन्स जारी केले आहेत.
आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर केला होता. तर, माजी सैनिक बबन भोसले यांनीही तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल करत सोमय्यांची चौैकशी सुरु केली होती. तर, सोमय्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अटकपुर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. परंतु, आज न्यायालयाने अटकपूर्व जामीन रद्द केला आहे. यामुळे किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
यानुसार किरीट आणि नील सोमय्या यांना अटक करण्यापूर्वी 72 तासांची नोटीस देणं आवश्यक असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मुंबई पोलिसांसमोर चौकशीकरता पुन्हा हजर राहण्याचं नवं समन्स किरीट सोमय्यांना जारी केले आहे. किरीट सोमय्यांची 17 ऑगस्टला तर नील सोमय्यांची 18 ऑगस्टला पुन्हा होणार चौकशी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरु केली होती. या मोहीमेत ५७ ते ५८ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली होती. ही रक्कम किरीट सोमय्या यांनी लाटली. हा पैसा त्यांनी २०१४ ची निवडणूक लढवण्यासाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
किरीट सोमय्या यांच्या नेतृत्त्वाखाली 'सेव्ह विक्रांत' या उपक्रमातंर्गत पैसे जमवण्यास सुरुवात झाली. चर्चगेटपासून अंबरनाथपर्यंतच्या रेल्वे स्थानकांवर किरीट सोमय्या यांच्या लोकांनी डबे फिरवून पैसे गोळा केले. या माध्यमातून ५७ ते ५८ कोटी रुपयांचा निधी जमा झाला होता. ही रक्कम आपण राजभवनाकडे सुपूर्द करू, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले होते. मात्र, माहिती अधिकारातंर्गत राजभवन कार्यालयाला तशी विचारणा केली तेव्हा आमच्याकडे असे कोणतेही पैसे जमा झाले नसल्याचे सांगण्यात आले.