कराडची महिला व बालकल्याण समिती राज्यात सर्वोत्कृष्ट

कराडची महिला व बालकल्याण समिती राज्यात सर्वोत्कृष्ट

Published by :
Published on

अरविंद जाधव, कराड | नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने  2017 ते 2018 या सालात केलेल्या उत्कृष्ट कार्याची नोंद घेऊन अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने ब वर्ग नगरपालिका गटात राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित केला आहे. 2017 पासून सभापती स्मिता हुलवान यांनी सलग चार वर्षे महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद भुषवले आहे. या पुरस्कारामुळे सभापती म्हणून हुलवान यांनी केलेल्या कामाची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली आहे.

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, महापौर परिषद, नगरपरिषद महासंघ यांनी 2014 सालापासून राज्यातील महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला व बालकल्याण समित्यांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2017-18 या आर्थिक वर्षातील पुरस्कारासाठी राज्यातील पालिकांच्या महिला व बालकल्याण समित्यांकडून विहित नमुन्यात माहिती मागवण्यात आली होती. पुरस्कारासाठी समित्यांची निवड करण्यासाठी अनुभवी नगरसेविकांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने ब वर्गात कराड नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीस राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित केला आहे.

नगरपालिका व नगरपंचायत गटात पहिले तीन व उत्तेजनार्थ असे एकूण 13 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच या पुरस्काराचे वितरण होणार आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित पाटील यांनी याबाबतचे पत्र कराड नगरपालिकेस पाठवले आहे.  

कराड पालिकेत 2017 पासून स्मिता हुलवान यांनी सलग चार वर्षे महिला व बालकल्याण समितीचे सभापती पद भुषवले आहे. अभ्यासू नगरसेविका असणाऱ्या स्मिता हुलवान यांनी या कमिटीमार्फत विविध योजना व उपक्रम राबवले. यात प्रामुख्याने महिलांना विविध कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण तसेच मोफत वाहन चालवण्याचे प्रशिक्षण त्यांच्या समितीमार्फत देण्यात आले होते. महिलांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी या समितीने विविध उपक्रम राबवले आहेत. चार वर्षांत या समितीला वेगळी ओळख निर्माण करुन दिली. या यशाबद्दल कराडकर नागरिकांनी स्मिता हुलवान यांचे अभिनंदन केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com