Kalyan : आई वडिलांसाठी तो बनला तोतया पोलीस; रेल्वे पोलिसांनी केला भांडाफोड
कल्याण : कल्याण रेल्वे पोलीसांनी पोलिसांचा गणवेश घालून पोलीस असल्याचे भासवणाऱ्या एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. अभिषेक सानप असे या अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो नाशिक येथील सिन्नर मधील राहणारा आहे. या मुलाच्या तपासात जी माहिती समोर आली ती ऐकून पोलिसांनी देखील डोक्यावर हात मारला. अभिषेकच्या आई-वडिलांची इच्छा होती त्याने पोलीस बनावं, म्हणून अभिषेकने डुप्लिकेट गणवेश घालून माझे एसआरपीएफमध्ये सिलेक्शन झाले असून मला रेल्वेमध्ये महिला डब्यात सुरक्षा कर्मचारीची ड्यूटी लागली आहे, असे आई वडिलांनी सांगितले होते.
कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले खाडे यांची वाशिंद रेल्वे स्थानकात ड्यूटी होती. ड्यूटी करीत असताना त्यांनी लोकलमध्ये एक गणवेशधारी पोलिस दिसून आला, फलाट क्रमांक दोनवर आलेल्या सीएसटी लोकल गाडीच्या मधल्या जनरल डब्यात हा उभा होता. खाडे यांना संशय आला त्यानी या तरुणाची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या तरुणाला लोकलमधून उतरविण्यास सुरुवात केली. मात्र लोकल सुरु झाली. खाडे यांनी लगेच खडवली रेल्वे स्थानकातील पोलिसांना संपर्क केला. मात्र संपर्क न झाल्याने टिटवाळा रेल्वे स्थानकातिल रेल्वे पोलिसाशी संपर्क केला, टिटवाळा रेल्वे स्थानकात रेल्वे पोलीस आणि आरपीएफ महिला जवान टेके यांच्या मदतीने गणवेशधारी पोलिसाला गाडीतून उतरविले.
कल्याण रेल्वे पोलिसांनी तपास केला असता या तरुणाची खरी माहिती समोर आली. या नकली पोलिसाला रेल्वे पोलिसांनी अटक केली असून पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.