जयंत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; लोकलसंदर्भात केली 'ही' मोठी मागणी
मुंबई : गणेशात्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. गणेशोत्सवाच्या काळात रात्री उशिरा दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भक्तांचे हाल लक्षात घेता राज्य सरकारने केंद्र सरकारशी चर्चा करून शेवटच्या लोकल ट्रेननंतर काही विशेष रेल्वे लोकल सेवा सुरु कराव्यात, अशी मागणी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
जयंत पाटील यांचे पत्र
आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे मागील बुधवारी आगमन झाले. मुंबईसह संपूर्ण राज्यात आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने तब्बल दोन वर्षांनंतर आपण हा उत्सव निर्बंधांशिवाय साजरा करत आहोत.
मुंबईत गणेशोत्सवाची शान काही औरच असते याची कल्पना आपल्याला असेलच. श्री सिद्धीविनायक मंदिर, लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळ, चिंचपोकळीचा चिंतामणी, जी.एस.बी मंडळ, गिरगावचा राजा अशा अनेक प्रसिद्ध गणपतींचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत असतात.
नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी तर भाविक, रात्र आणि दिवसही न पाहता ८-८ तास रांगेत उभे असतात. रात्री उशिरा दर्शन घेऊन परतल्यानंतर त्यांना पहाटेची पहिली रेल्वे लोकल मिळेपर्यंत वाट पहावी लागते. अशा परिस्थितीत आपण केंद्रशासनाशी चर्चा करून रात्री शेवटच्या रेल्वे लोकलनंतरही भाविकांसाठी काही विशेष रेल्वे लोकल सेवा सुरु करण्याबाबत विनंती करावी. जेणेकरून गणेशभक्तांना दिलासा मिळेल.
आपले सण, संस्कृती, उत्सव जपण्याचे अधिकार राज्यातील प्रत्येक नागरिकाला आहेच. मात्र, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची काळजी घेणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.