जळगावातील अनोखी परंपरा! मानाचा गणपतीच्या वतीने दर्ग्यावर चादर, मुस्लिम बांधवांची मिरवणुकीवर पुष्पवृष्टी
मंगेश जोशी | जळगाव : राज्यभरात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे. तर, दुसरीकडे ईद-ए-मिलाद साजरी केली जात आहे. अशातच, जळगावमधून सामाजिक बांधिलकी जपणारी घटना समोर येत आहे. जळगावातील भिलपुरा भागात महापालिकेतील मानाचा गणपतीच्या वतीने लालशहा बाबा दर्ग्यावर चादर चढवण्यात आली आहे. तसेच, मुस्लिम बांधवांच्या वतीने मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील भिलपुरा भागात महापालिकेतील मानाच्या गणपतीच्या वतीने लाल शहा बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढवण्यात आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांच्या हस्ते मानाचा गणपतीच्या वतीने लाल शहा बाबा यांच्या दर्ग्यावर सादर चढवण्यात आली. तरी याप्रसंगी मुस्लिम बांधवांकडून मानाचा गणपती विसर्जन मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
जळगाव शहरात 1970 साली धार्मिक स्थळ निर्माण होऊन मोठी दंगल घडली होती व त्यामुळे दोन धर्मीयांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर हाजी अश्रफ अली त्यांच्या संकल्पनेतून सय्यद निजाज अली यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करून हिंदू मुस्लिम एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न केला व तेव्हापासून मानाच्या गणपतीच्या वतीने लालशहा बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढवली जाते. हिंदू-मुस्लिम एकोप्याची ही परंपरा गेल्या 50 वर्षापासून आजही अविरतपणे सुरू आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ढोल पथकाच्या गजरात झांज वाजवत जल्लोष साजरा केला.