मुख्यमंत्र्यांच्या घोषणांनंतरही शेतकरी आंदोलन सुरुच; मोर्चाचे नेते म्हणाले...
मुंबई : शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. तसेच, विविध घोषणा करत शेतकऱ्यांनी लाँगमार्च आंदोलन थांबवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. परंतु, याची अंमलबजावणी होत नाही तोवर आम्ही वाट पाहणार आहोत. तोपर्यंत मुक्काम करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार जे.पी. गावित यांनी दिली आहे.
काय म्हणाले जे. पी. गावित?
काल झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी आज उत्तर दिलं. मात्र, शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण झालेली नाही. अंगणवाडी सेविकांना मानधनांमध्ये वाढ करण्यात आली आहे. वन जमिनीचे पट्टे यासाठी समिती गठन केली आहे. कसणाऱ्यांचे दावे पुन्हा तपासून जमिन ताब्यात दिली पाहिजे. मुख्यमंत्र्यानी आमच्या समोर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही तोवर आम्ही वाट पाहणार आहोत. तो अहवाल आल्यानंतर आम्ही माघार घेऊ. परंतु, तोपर्यंत कसारा येथील वाशिंद गावात मुक्काम करणार असल्याचे गावित यांनी म्हंटले आहे. आमच्या हातात कॉपी मिळाली नाही, उद्या मिळेल. त्यानंतर चर्चा करून निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांवर तातडीने निर्णय घेतानाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान जाहीर केले होते त्यात आता वाढ करून ३०० रुपयांऐवजी ३५० रुपये सानुग्रह अनुदान अशा विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी करण्याचे संबंधितांना निर्देश दिलेले आहे. त्याचा अनुभव उद्यापासून येईल. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार हे अधिकारी फिल्डवर जातील. मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतल्याने लाँगमार्च आंदोलन थांबवावे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.