अंबानींच्या घराबाहेरील इनोव्हा गाडीचा उलगडा?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलीया निवासस्थानाबाहेर एक बेवारस स्कॉर्पिओ आढळून आली होती. या संशयित गाडीत जिलेटीनच्या कांड्या आढळल्यानं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली.
स्कॉर्पिओ गाडीला पार्क करून एक इनोव्हा गाडी जाताना सीसीटीव्हीत दिसून आली होती. याच इनोव्हा गाडीचा आता उलगडा होण्याची शक्यता आहे. संबंधित पांढऱ्या रंगाची इनोव्हा आता राष्ट्रीय तपास संस्था एनआयएनं शोधून काढली आहे. ही इनोव्हा ठाण्यातील एका व्यावसायिकाची असल्याचं आता बोललं जात आहे. या गाडीचा मालक ठाण्यातील व्यावसायिक असल्याचा प्राथमिक अंदाज आता वर्तवला जात आहे.
अंबानींच्या घराबाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक व्यापारी मनसुख हिरेन असल्याचं सिद्ध झालं होतं. यानंतर हिरेन यांचा मृतदेह खाडीत आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असलेले सचिन वाझे यांच्याभोवती संशयाची सुई निर्माण झाली. विरोधी पक्षानं आक्रमकपणे वाझे यांच्या अटकेची मागणी केली होती. अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना अटक झाली आहे.