Mangalagaur : चल गं बाई खेळूयाऽऽ मंगळागौर!  साता समुद्रापार भारतीय महिलांनी मंगळागौरीचे खेळ खेळत जपली परंपरा

Mangalagaur : चल गं बाई खेळूयाऽऽ मंगळागौर! साता समुद्रापार भारतीय महिलांनी मंगळागौरीचे खेळ खेळत जपली परंपरा

श्रावणातील सगळ्या महिला वर्गाचा आवडता सण मंगळागौरी. हा सण साता समुद्रापार ऑस्ट्रेलियात देखील भारतीय महिलांनी परंपरा जपत आयोजित केला.
Published by :
shweta walge
Published on

श्रावणातील सगळ्या महिला वर्गाचा आवडता सण मंगळागौरी. हा सण साता समुद्रापार ऑस्ट्रेलियात देखील भारतीय महिलांनी परंपरा जपत आयोजित केला. "सह्याद्री सिडनी ऑर्गनायझेशन"ने ऑस्ट्रेलियात पारंपरिक पद्धतीने मंगळागौर साजरी करून मराठी संस्कृतीचा उत्सव साजरा केला. हा विशेष कार्यक्रम मराठमोळ्या महिलांना एकत्र येऊन आपल्या परंपरांचा आणि संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात मंगळागौर पूजनाने झाली, ज्यामध्ये महिलांनी पारंपारिक विधी करून देवीची आराधना केली. पूजनानंतर महिलांनी पारंपारिक गीतांच्या तालावर फुगड्या, झिम्मा आणि अनेक खेळ खेळले. या उत्साही वातावरणात सगळ्यांनी आनंदाने सहभाग घेतला. फुगड्या आणि झिम्मा खेळताना मराठी स्त्रियांचा उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता. महिलांनी आकर्षक साड्या, नथ, चंद्रकोर आणि पारंपारिक दागिन्यांनी सजून, आपल्या मुळ परंपरांना न्याय दिला. गाजलेल्या पारंपारिक खेळांमध्ये सहभाग घेऊन, एकमेकांशी स्नेह वाढवण्याचा आणि सांस्कृतिक बंध जपण्याचा प्रयत्न केला.

मंगळागौर सणाचे महत्व केवळ धार्मिक पातळीवर नसून सामाजिक पातळीवर देखील आहे. या कार्यक्रमाने महिलांना एकत्र येऊन आपली संस्कृती आणि परंपरा साजरी करण्याची संधी दिली. कार्यक्रमादरम्यान महिलांनी मराठमोळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला, ज्यामध्ये पुरणपोळी, वडे, आणि गोड-धोड पदार्थांचा समावेश होता.

सह्याद्री सिडनी ऑर्गनायझेशनने आयोजित केलेल्या या मंगळागौर कार्यक्रमाने ऑस्ट्रेलियातील मराठी महिलांना आपल्या मुळाशी जोडून ठेवण्याचा एक उत्कृष्ट प्रयत्न केला. हा कार्यक्रम एक आठवणीत राहणारा अनुभव ठरला, ज्यामुळे मराठी महिलांनी एकत्र येऊन आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचे ध्येय साध्य केले.

मराठी परंपरांचा आणि कुटुंबाच्या बंधांचा सण असलेल्या मंगळागौरीच्या या विशेष कार्यक्रमाने सगळ्यांच्या मनात आनंद आणि समाधान निर्माण केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com