अल्पवयीन मुलीला पाहून अश्लील कृत्य; एकाला अटक
रिध्देश हातीम | मुंबई : कांदिवलीतील चारकोप परिसरात एका अल्पवयीन मुलगी व तिच्या आईसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या एक 59 वर्षीय व्यक्तीला चारकोप पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी २०२० पासून हा प्रकार करत असल्याचे उघडकीस आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ४६ वर्षांची असून कांदिवलीतील चारकोप परिसरात तिच्या १६ वर्षाच्या मुलीसोबत राहते. आरोपीने पीडित महिलेला पाहून यापूर्वी अश्लील कृत्य केले होते. पण, महिलेले दुर्लक्ष केले. आरोपी हा तक्रारदाराच्या समोरच्या घरात राहत असून तो मागील आठ वर्षापासून तिथे राहतो. मात्र, त्याने हे अश्लील कृत्य 2020 पासून सुरू केले.
अल्पवयीन मुलीने अनेकदा या सर्व घटनेला दुर्लक्ष केले. मात्र, नुकतेच आरोपीने पीडित मुलीला पाहून पुन्हा अश्लील कृत्य केल्याचे तिने सांगितल्यानंतर अखेर महिलेने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी ५९ वर्षीय आरोपीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. २०२० पासून १४ मे या कालावधीत आरोपी हा प्रकार करत होता, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.