पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढणार; हवामान विभागाचा अंदाज
मुंबई : राज्यभरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्याला इशारा दिला आहे. पुढील पाच दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा विकसित झाला आहे. आणि वायव्य दिशेला त्याची हालचाल होण्याची शक्यता असल्याने पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. तर, मुंबई, पालघर, ठाण्यासह रायग, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, बुलढाणा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक धरणे भरली आहेत तर काही भरण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर, दुर्घटना घडण्याचे प्रमाणही वाढले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले असून पुरसंभाव्य ठिकाणांवर एनडीआरएफ टीम तैनात केल्या आहेत.