भाजपावाले शेपूट तोंडात कोंबून… शिवसेनेची टीका
महाराष्ट्रातील सर्व दुकानांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असले पाहीजे असा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी (१२ जानेवारी २०२२ रोजी) झालेल्या बैठकीत घेतला होता. मात्र या निर्णयानंतर व्यापारी संघटनामध्ये नाराजी दिसत आहे. या निर्णयाला व्यापारी विरोध करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं व्यापारी संघटनांबरोबरच राजकारण्यांवरही निशाणा साधलाय. शिवसेनेच्या अग्रलेख सामनामधून शिवसेनेने राजकारण्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. "मुंबई-ठाण्यातील भगवा झेंडा उतरविण्याचे आजपर्यंत काय कमी प्रयत्न झाले? प्रत्येक वेळी मुंबई महापालिकेवरील शिवरायांचा भगवा ध्वज उतरविण्याच्या वल्गना केल्या जातात. हे तेच वल्गनाबाज आहेत जे मराठी भाषा आणि मराठी पाट्यांना विरोध करीत आहेत.
"मराठी भाषा आणि संस्कृतीचे शत्रू आपल्या घरातच आहेत हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. राज्यातील दुकाने, आस्थापनांच्या पाट्या आता मराठीतच असतील, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेताच त्यावर महाराष्ट्रातल्या लोकांनीच टीका-टिप्पणी सुरू केली आहे. त्यांनी निदान गप्प तरी बसावे, पण तसे न करता महाराष्ट्रातच मराठीचे गारदी म्हणून ते टीकेच्या तलवारी हवेत फिरवत आहेत. मराठी पाट्यांची सक्ती करण्याची गरज काय, इथपासून ते आम्ही हे होऊ देणार नाही इथपर्यंत प्रकरण पोहोचले आहे," असे शिवसेनेने म्हटलं आहे.
यासोबतच "मुंबईतील भाजपाधार्जिणा असा व्यापारी संघटनेचा अध्यक्ष तर मराठी पाट्यांसंदर्भात आव्हानाची भाषा करतोय. धमक्या देतोय व समस्त भाजपावाले त्यावर पाठीमागची शेपूट सरळ तोंडात काेंबून गप्प बसले आहेत. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे व मराठीचा सन्मान राहिलाच पाहिजे, अशी भूमिका घेणे यात काय चुकले?," असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे. मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या नतद्रष्टांनी 'मराठी'चा युद्ध इतिहास समजून घ्यावा. नंतर मराठी विरोधकांच्या गोवऱ्या मसणात रचल्यावर रडगाणी गाऊ नयेत," असा टोला लेखाच्या शेवटी लगावण्यात आलाय.