शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जाणार असाल तर खबरदार!
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असतानाच राज्य सरकारने शिवजयंती उत्सवाबद्दल अनेक नियम व अटींचे पालन करण्याचे निर्देश केले होते, त्यानंतर सरकारवर विरोधीपक्षाने जोरदार टीका केली. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात याबद्दल अनेक चर्चा झाल्या. शिवजयंतीवरून आता नवीनच वाद पेटण्याची चिन्ह आहेत कारण ठाकरे सरकारने आता शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जाणाऱ्या लोकांवर बंधनं घातली आहेत. शिवनेरीवर कलम 144 लागू करून आता जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
यंदा कोरोनामुळे सरकारने किल्ल्यावर जास्त गर्दी होऊ नये यासाठी तयारी केली आहे. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शिवनेरी शिवजंयती उत्सव साजरा केला जाणार आहे, त्यामुळे शिवप्रेमींनी गर्दी करू नका, असं आवाहन स्थानिक आमदार अतुल बेनके यांनी शिवप्रेमींना केलं आहे. दरम्यान, शिवजयंतीच्यादिवशी आरोग्य विषयक कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने यापूर्वी स्पष्ट केलं आहे.