सचिन वाझेप्रकरणी गृहमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका म्हणाले…
अंबानी स्फोटक प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) सचिन वाझे यांना शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करीत आहे. शनिवारी सचिन वाझे यांची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर एनआयएने त्यांना अटक केली.उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला आहे. सचिन वाझे यांची जवळपास 12 तास चौकशी केल्यानंतर एनआयएने त्यांना अटक केली.
या प्रकरणावर महाराष्ट्र सरकार आणि गृह विभागाच्या कारवाईकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित प्रकरणावर भाष्य केलंय. अनिल देशमुख म्हणाले की, उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेल्या जिलेटीनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओचा आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास एनआयए व एटीएसकडून सुरू आहे. त्यामुळे, चौकशीनंतर सत्य बाहेर येईल, त्यानुसार आरोपींवर कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले आहे.