31 डिसेंबरला मुंबईत हायअलर्ट जारी, पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात आले आहे. भारतीय गुप्तचर खात्याने दिलेल्या माहितीनुसार चार आतंकवादी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानुसार मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल परिसरात अत्याधुनिक हत्यारांसह पोलिसांची तसेच फोर्स वनची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. ताज हॉटेलची खाजगी सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला या परिसरात नागरिकांची खूप गर्दी असते. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांनाही सतर्क राहण्याची विनंती केली आहे
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी प्लॅन तयार केले आहेत. मात्र, कोरोना निर्बंधामुळे न्यू इअर पार्टीवर मर्यादा आल्या आहेत. मुंबईमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे मुंबईत 7 जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू असणार आहे. मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलेलं आहे. तसेच केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आली आहे.
मुंबई कायम दहशतवाद्याच्या निशाण्यावर असते. आता 31 डिसेंबरला दहशतवाद्यांकडून धोका असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली आहे. त्यामुळे मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांच्या उद्या (31 डिसेंबर ) सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहे.