Heavy Rain
Heavy Rain Team Lokshahi

Heavy Rain : थर्माकोलच्या होडीवर बसून 7 किलोमीटरचे अंतर कापत वराने गाठले लग्नमंडप

गेल्या 10 दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. धरणांमध्ये जलसाठ्यातही चांगलीच वाढ झाली आहे. कोकण, विदर्भात पावसाचा फटका अधिक बसला आहे.

मराठवाड्यातील 53 महसूल मंडळात अतिवृष्टी

  • अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान.

  • एक आठवड्यापासून मराठवाड्यातील बहुतांश गावांमध्ये सूर्यदर्शन नाही.

  • मराठवाड्यात काही ठिकाणी दिलासादायक पाऊस तर काही गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण.

  • पाऊस सुरूच राहिल्यास शेतातील पिके पिवळी होऊन नुकसान क्षेत्र वाढण्याची शक्यता.

भींत पडून विद्यार्थी जखमी

बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. बीड तालुक्यातील कामखेडा इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीचा भिंतीचा भाग हातावर कोसळल्याने एक विद्यार्थी जखमी झाला. या घटनेत विजय ओव्हाळ या विद्यार्थ्याच्या हाताला फ्रॅक्चर झालंय. दरम्यान या घटनेने जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची जीर्ण अवस्था पुन्हा एकदा समोर आलीय. जिल्हा परिषद शाळेतील असुविधांमुळे पाल्यांना शाळेत पाठवावे की नाही? असा प्रश्न पालकांना पडला आहे. मान्सून पूर्व या शाळांची दुरुस्ती करणं गरजेचं होतं. मात्र जिल्हा प्रशासनाने या प्रश्नाकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय.

नागपूरमध्ये एकाचा मृत्यू

नागपूर शहरासह विदर्भात गेल्या 4 ते 5 दिवसात पाऊस बरसतोय. नागपूर शहरामध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे काल झालेल्या पावसामुळे नागपूरमध्ये घर पडून एकाचा मृत्यू झाला.

पुरात दोघं गेले वाहून, एक बेपत्ता

मध्यप्रदेशातील गावी जात असताना दोन तरुण मोटरसायकसह वाहून गेल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील कवलेवाडा-चिखला रस्त्यावरील नाल्यावर रात्रीच्या वाजताच्या सुमारास घडली आहे. यापैकी एक जण बचावला तर दुसरा बेपत्ता आहे. गोबरवाही पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात येत आज पहाटे पासून शोधकार्य सुरु आहे. सारांश मुन्नालाल सुखदेवे वय 27 वर्ष रा. खैरलांजी जि. बालाघाट (मध्यप्रदेश) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे।. र रवी सेवक टेकाम 31 वर्ष र रा. खैरलांजी जि. बालाघाट असे बचावलेल्या तरूणाचे नाव आहे

वराने होडीत बसून गाठले लग्नमंडप

नांदेड जिल्ह्यसह राज्यभरात मागील पाच दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे..त्यामुळे अनेक नदी-नाल्याना पूर आलाय. अनेकांचे सर्वच व्यवहार ठप्प पडलेत. त्यातच ननदेड जिल्ह्यतील हदगाव तालुक्यातल्या करोडी येथील शहाजी राकडे या युवकाचा विवाह आज यवतमाळ जिल्ह्यातल्या संगम चिंचोली येथील तरुणीशी निश्चित करण्यात आला होता. मात्र पैनगंगा नदीला पूर आल्याने सर्व वाहतूक ठप्प होती. त्यामुळे या वराने चक्क थर्माकोलच्या होडीवर बसून 7 किलोमीटरचे अंतर कापत अखेर वराने लग्नमंडप गाठले आहे.

मुळा नदीला पूर

मुळा नदीला पूर आला असून मुळा नदी काठावरच्या गावांनान सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. पिंपळगाव खांड धरण पाणलोटात क्षेत्रात पावसाने जोर धरल्याने मुळा नदीला पूर आला आहे. मुळा नदीतील पाणी आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील सर्वाधिक साठवण क्षमता असलेले मुळा धरण २६००० दलघफु क्षमतेच्या या धरणातील पाणी साठा गुरूवारी सायंकाळी १२३७२ (४७.५८ टक्के) होता. धरणातील येणारी आवक लक्षात घेता सकाळपर्यंत या धरणातील आवक लक्षात घेता आतापर्यंत धरणातील पाणीसाठा ५० टक्काच्या पुढं गेला होता.

उरमोडी धरणातून 2000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग

उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस असल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. उरमोडी धरणातील पाणी पातळी निर्धारित पाणी पातळी पेक्षा अधिक झाल्यामुळे सांडव्यावरील वक्रद्वारामधून उरमोडी नदीपात्रातून आज सकाळी 11 वाजता 2000 क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे. उरमोडी नदीकाठावरील गावातील सर्व ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामस्थ , यांनी गांभीर्याने नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले असून ग्रामस्थ, शेतकरी आणि पर्यटकांनी कोणत्याही कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सातारा- मराठवाडी धरणात 32 टक्के साठा

सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी विभागातील मराठवाडी धरणात 32.14 टक्के पाणीसाठा झाला आहे.धरणक्षेत्रात पावसाची सततधार सुरू असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी धरणातून विसर्गही सुरू ठेवण्यात आला आहे. जलाशयाच्या काठावरील मेंढ आणि उमरकांचन या गावाभोवती पाण्याचा वेढा हळूहळू वाढत चालला असून जुनी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.अनेक धरणग्रस्त कुटुंबांचे निवारा शेडमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. तब्बल 25 वर्षानंतर बांधकाम पूर्ण झालेल्या आणि तांत्रिक दुरुस्तीसाठी यावर्षी उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात रिकाम्या केलेल्या मराठवाडी धरणात यावर्षी प्रथमच पूर्ण क्षमतेने पाणी साठा करण्यात येत असल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे.

मुंबईत सर्वाधिक उंचीच्या लाटा

यंदाच्या मोसमातली सर्वात उंच भरती आज समुद्रात असेल. दुपारी १ वाजून २२ मिनिटांनी समुद्रात भरती आहे आणि यावेळी समुद्रात ४.८७मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. समुद्राला उधाण असल्यानं प्रशासनानं नागरिकांनाही सावधगिरीचा इशारा दिलाय. समुद्रकिनारी जाण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

पावसाचा 11 हजार हेक्टरवरील शेतीला फटका

चंद्रपूर जिल्ह्यात खरीपाची 64 टक्के पेरणी झाली आहे. यात कापूस, सोयाबीन, भात पिकाचा समावेश आहे. सतत सुरू असलेला पाऊस कापूस आणि सोयाबीन पिकासाठी मारक ठरला आहे. जिल्ह्यातील 50 महसुली मंडळांपैकी 25 मंडळात अतिवृष्टीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सपाट जमीन, नदी-नाल्याकाठावरील शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार जिल्ह्यात 11 हजार हेक्टरमधील पिकांना पावसाचा फटका बसला आहे. भातशेतीसाठी मात्र हा पाऊस सध्या उपयुक्त ठरला आहे.

गेल्या 10 दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. धरणांमध्ये जलसाठ्यातही चांगलीच वाढ झाली आहे. कोकण, विदर्भात पावसाचा फटका अधिक बसला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com