पुण्यात पावसाचा धुमाकूळ, सव्वा तासात 90 मिलीमीटरची नोंद; आजही मुसळधार पावसाची शक्यता
अमोल धर्माधिकारी | पुणे : राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्यातच पुण्याला चांगलेचं झोडपून काढलं आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं. या पावसाचे प्रमाण हवामान खात्याच्या शिवाजीनगर पर्जन्य मापक केंद्रावर नोंदला गेला आहे. सुमारे सव्वा तासाच्या दरम्यान झालेला पाऊस 90 मिलीमीटर एवढा होता.
पुण्यात अक्षरशः पावसाने हैदोस घातला आहे. काल रात्री पावणे दहा वाजता पुण्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. सव्वा तासात हवामान खात्याच्या शिवाजीनगर पर्जन्य मापक केंद्रावर नोंदला गेलेला पाऊस 90 मिलीमीटर एवढा होता. रात्री साडे अकरा वाजता पावसाचा जोर थोडासा ओसरला होता. मात्र, उपग्रह छायाचित्रणात गडद ढग स्पष्ट दिसत होते.
मागील 120 वर्षामध्ये 24 तासात सर्वाधिक पडलेला पाऊस 181.1 मिलीमीटर असून तो 5 ऑक्टोबर 2010 रोजी झाला होता. त्यानंतर 1961 मध्ये 131.9 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला होता.15 ऑक्टोबर 2020 रोजी 112.1 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला होता. मात्र, काल रात्री केवळ सव्वा तासात (रात्री 9:45 ते 11:00) या कालावधीत 90 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
अरबी समुद्रातून येणारे मोठ्या प्रमाणावरील बाष्प आणि स्थानिक स्थितीमुळे पुण्यात पावसाचा जोर वाढला. कमी वेळेत अधिक तीव्रता आणि मोठ्या कालावधीतील हा पाऊस शहरातील या हंगामातील पहिला पाऊस ठरला. आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवून दिला होता. सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते. अनेक घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. झाडे, फांद्या आणि भिंती कोसळण्याच्या घटनाही घडल्या. रात्री घराबाहेर असलेले अनेक नागरिक ठिकठिकाणी अडकून पडले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या धुवाधार पावसाने पुणेकरांमध्ये अक्षरश: धडकी भरवली. रात्री साडेनऊच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री बारापर्यंत कायम होता. शहरासह जिल्ह्यातही बहुतांश भागांत मुसळधार पाऊस झाला.