गणेशोत्सवात छत्री घेऊनच बाहेर पडा! महाराष्ट्रात तीन-चार दिवस मुसळधार
पुणे : ऑगस्ट महिन्यात ओढ दिलेल्या मान्सूनने गोकुळाष्टमीपासून पुन्हा हजेरी लावली आहे. अशातच, आता पुढील तीन-चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या ४८ तासात राज्यात मान्सून सक्रिय राहणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.
येत्या ४८ तासात राज्यात मान्सून सक्रिय राहणार आहे. रायगड, भंडारा, गोंदिया, नागपूरमध्ये तुरळक ते मुसळधार ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील उर्वरित भागात मेघगर्जेनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
२५ व २६ तारखेला राज्यात विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्यातही दुपारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून गणेशोत्सव काळात छत्री घेऊनच बाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाने नागरिकांना केले आहे.
दरम्यान, ऑगस्ट महिना उजाडला तरी अपेक्षेप्रमाणे पाऊस न पडल्याने पीक अक्षरशः कोमेजली आहेत. लाखोंचा खर्च वाया जातो की काय, अशी चिंता सध्या शेतकऱ्यांना सतावतांना दिसून येत होती. परंतु, हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.