चौकात या, समोरासमोर चर्चा करू…चंद्रकांत पाटलांचं चॅलेंज हसन मुश्रीफांनी स्वीकारलं!
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाने राज्यभरात चक्काजाम आंदोलन पुकारले. भाजपच्या सर्व आघाडीच्या नेत्यांनी आपआपल्या भागात चक्का जाम करुन, ओबीसी आरक्षणाची मागणी केली. कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात दाभोळकर कॉर्नरला हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.
भाजपाने ओबीसी समाजाचं आरक्षण घालवलं, असा आरोप होत असेल, तर कोल्हापूच्या बिंदू चौकात कोण्यातही दिवशी चर्चेला तयार आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. छगन भुजबळ आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची समोरासमोर चर्चा होऊ दे, असे पाटील म्हणाले. यावर हसन मुश्रीफांनी प्रत्युत्तर देत चंद्रकात पाटील यांना फटकारलं आहे. भाजप सरकारच्या पाच वर्षातील नाकर्तेपणामुळे समाजाचं आरक्षण कसं गेलं आणि समाज रस्त्यावर कसा आला याचे पुरावे मंत्री भुजबळ यांच्याकडे आहेत. त्यामुळे चर्चा होऊनच जाऊदेत, आम्ही तयार आहोत, असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी दिलेलं आव्हान स्वीकारल्याचं मुश्रीफ म्हणाले.