Cabinet Decission : सामाजिक न्याय विभागाकडील चारही महामंडळांच्या भागभांडवल वाढीचा शासन निर्णय जारी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत असलेल्या महामंडळांच्या भाग भांडवला (Capital) राज्य मंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीत मोठी वाढ करण्यात आली आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पाठपुराव्यास मोठे यश आले असून धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 4 महामंडळाचे भागभांडवल वाढवण्याचा निर्णय झाला होता. त्याची अंमलबजावणी होत असून, राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा पूर्वी 500 कोटी होती, ती वाढवून 1000 कोटी करण्यात आली आहे. त्याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या भागभांडवलाची मर्यादा 300 कोटींवरून 1000 कोटी करण्यात आली आहे. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची मर्यादा पूर्वी 73.21 कोटी कोटी, ती देखील वाढवून 1000 कोटी करण्यात आली; तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा 50 कोटींवरून 500 कोटी करण्यात आली आहे.
संबंधीत महामंडळाच्या भागभांडवल वाढीसाठी आमच्या विनंतीवरून राज्य सरकारने भरभरून निधी दिला. अतिरिक्त निधी टप्याटप्याने महामंडळांना वितरित करण्यात येईल. या महामंडळांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्यक्ष लाभ मिळणाऱ्या गरजू लाभार्थींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून, त्यांना थेट लाभ मिळाल्याने त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचा विशेष आनंद असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांसह महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.