शंभूराजांच्या स्मारकासाठी 250 कोटींची तरतूद; शंभूभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण
काल माहाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प 2022-23 ह्या आर्थिक वर्षासाठी सादर केला गेला. ह्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या गेल्या. अनेक क्षेत्रांमध्ये मोठे निर्णय घेण्यात आले. ह्या अर्थसंकल्पानंतर सर्व राजकीय पक्षांतून संमिश्र प्रतिक्रीया येतायत. केवळ राजकीय पक्षच नव्हे तर इतरही सर्वच स्तरांतून ह्या अर्थसंकल्पाबद्दल प्रतिक्रीया समोर येतायत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटी रूपयांची तरतूद केली असल्याचे जाहीर केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक वढू बुद्रुक येथे उभारण्यात यावे. स्मारकाचे काम करताना छत्रपती संभाजी महाराजांच्या समकालीन वास्तुरचनांचा आधार घ्यावा. दर्शनासाठी येणाऱ्या चाहत्यांची योग्य सोय व्हावी, याची काळजी घेण्यात यावी. या अनुषंगाने 250 कोटींचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
दरम्यान, याचमुळे वढू बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन व फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला. संपूर्ण राज्यातील शंभूभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.