मोठी बातमी! चौंडीत जाण्यापासून गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा पोलिसांनी अडवला
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांची आज 297वी जयंती आहे. मात्र, या जयंतीला राजकीय रंग लागल्याचं दिसून येत आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या अहमदनगरमधील चौंडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या कार्यक्रमादरम्यान एक मोठी घडामोड घडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आज चौंडी येथे अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे सुद्धा चौंडी येथे पोहोचणार आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोप आज चौंडीत होणार आहे. त्यामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी शरद पवार आणि गोपीचंद पडळकर हे आमने-सामने येण्यापुर्वीच राजकीय संघर्ष पाहायला मिळतं आहे.
चौंडीत जाण्यापासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी रोखले आहे. गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवल्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचेही समोर आले आहे. परिणामी या कार्यक्रमावरुन आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (BJP vs NCP) असा राजकीय सामना रंगताना दिसून येत आहे.
'मी यात्रेवर ठाम आहे. आज आमची यात्रा चौंडीत जाण्यापासून का अडवताय. हे राजकारण कशासाठी करताय. आज त्यांच्या नातवाला लाँच करण्यासाठी अहिल्याबाईंच्या धर्मस्थळाचे राजकारण करु पाहता, याचा मी जाहीर निषेध करतो, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.