गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक…सोलापुरात भाजपा समर्थकांची पवारांविरोधात घोषणाबाजी
भाजपाचे विधानपरिषदेवरील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये गाडीचं नुकसान झालंय. मात्र, कोणालाही इजा झाली नाहीय. गोपीचंद पडळकर यांनी संबंधित माहिती दिली आहे.
मात्र, हे सांगताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "मड्डेवस्तीत बैठक झाल्यानंतर गाडीत बसलो आणि काही अंतरावर गेल्यावर गाडीवर दगड फेकण्यात आले. त्यानंतर ते सगळे पळून गेले. राज्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की पवारांच्या नेतृत्वाखाली कशी गुंडगिरी चालते. कुणालातरी पुढे केलं असेल", असं पडळकर म्हणाले आहेत. त्यामुळे यावरून पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
या प्रकारानंतर पडळकरांच्या समर्थकांनी एकत्र येत घोषणाबाजी सुरू केली. त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका देखील केली. सकाळीच पडळकर यांनी शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी असल्याचे वक्तव्य केलं. यानंतर आता वादाला तोंड फुटलंय.