Omicron Corona | ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ५ ते ७ डिसेंबर दरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५ वा महापरिनिर्वाण दिन येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक ६ डिसेंबर २०२१ रोजी आहे. यानिमित्त असंख्य अनुयायी 'ग्लोबल पॅगोडा'मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी येत असतात. मात्र, कोरोनाचा नवा व्हेरीयंट ओमिक्रॉनच्या धोका लक्षात घेता 'ग्लोबल पॅगोडा' बंद ठेवण्यात येणार आहे. अनुयायांनी ग्लोबल पॅगोडा येथे येऊ नये, असे आवाहन महानगरपालिका उप आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे व 'ग्लोबल पॅगोडा'चे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे केले.
गोराई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी येत असतात. कोरोनाचा नवा व्हेरीयंट ओमिक्रॉनच्या धोका लक्षात घेता, खबरदारीची उपाययोजना म्हणून दिनांक ५ ते ७ डिसेंबर २०२१ दरम्यान 'ग्लोबल पॅगोडा' बंद ठेवण्यात येणार आहे. तरी, अनुयायांनी दिनांक ५ ते ७ डिसेंबर २०२१ दरम्यान ग्लोबल पॅगोडा येथे येऊ नये आणि कोरोना (ओमिक्रॉन नवीन विषाणू प्रजाती) संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका उप आयुक्त (परिमंडळ – ७) डॉ. भाग्यश्री कापसे व 'ग्लोबल पॅगोडा'चे प्रतिनिधी यांनी केले आहे.