विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आजपासून अहमदनगर नाही तर अहिल्यानगर
विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाष्ट्रातील अहमदनगर जिल्हा आजपासून अहिल्यानगर झाला आहे. राज्य शासनाने त्यासंदर्भातील अधिसूचनासुद्धा आज म्हणजेच 9 ऑक्टोंबरला काढली आहे. मागील आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता.
अहमनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ करण्यासंदर्भातील सर्व कायदेशीर प्रक्रिया राज्य शासनाने पूर्ण केल्या आहेत. त्यानुसार आज राज्य शासनाच्या राजपत्रात त्याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. आता अहमदनगर शहर नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्य सरकारने याआधी औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे देखील अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव असे नामकरण केले आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी देखील या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करावे अशी मागणी केली होती.