महाराष्ट्रात कोरोनाची मोफत लस द्यावी; नवनीत राणा यांची ठाकरे सरकारला विनंती
लोकशाही न्यूज नेटवर्क | देशात कोरोना लसीकरणाची प्रक्रिया अवघ्या बोटांवर मोजण्या इतक्या दिवसांवर ठेपली आहे. महाराष्ट्रातही लसीकरण प्रक्रिया सुरु होणार आहे. या दरम्यान महाराष्ट्र राज्यात सुद्धा मोफत लस सर्व सामान्य नागरिकांना मिळावी अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. त्यामुळे ठाकरे सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
संपूर्ण देशाला कोरोना लसीची प्रतीक्षा लागलेली आहे.कोरोना लसीला देशात मान्यता मिळाल्यानंतर सर्वप्रथम आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. मात्र सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कोरोना लस केव्हा मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. पश्चिम बंगाल,दिल्ली व बिहार मध्ये मोफत लस देण्याची घोषणा त्या त्या राज्यात करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात सुद्धा मोफत लस सर्व सामान्य नागरिकांना मिळावी अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले त्यामुळे गरीब माणूस चिंतेत आहे, आम्हाला मोफत लस मिळणार का हा प्रश्न त्यांच्या मनात आहे ? त्यामुळे राज्य सरकारने सर्व सामान्य नागरिकाला दिलासा द्यावा, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.