आदर पुनावाला यांना एक कोटीच्या गंडाप्रकरणी बिहारमधून चौघे ताब्यात
चंद्रशेखर भांगे | पुणे : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांना तब्बल एक कोटीचा गंडा घातल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता पोलिसांनी तीन महिन्यानंतर चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. बिहारमधून या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
माहितीनुसार, आरोपींनी कंपनीचे संचालक सतीश देशपांडे यांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठवत स्वत:ची ओळख आदर पूनावाला अशी दिली आणि सतीश देशपांडे यांची १,०१,०१,५५४ रुपयांची मागणी केली. सिरमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मेसेज पाठवून विविध खात्यात पैसे पाठवण्यास सांगून तब्बल एक कोटी एक लाख रुपयांची आरोपींनी फसवणूक केली होती.
आरोपीने आदर पुनावाला यांचा मोबाईल हॅक करुन त्यांच्या नंबरचा वापरला होता. याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. गेल्या तीन महिन्यापासून याचा तपास करून बंड गार्डन पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
राजीवकुमार शिवाजी प्रसाद, चंद्रभूषण आनंद सिंग, कन्हैया कुमार संभो महतो आणि रवींद्र कुमार हुबनाथ पटेल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अशोक आरोपी देशभरातील अनेक दिग्गज राजकीय मंडळी यांच्यासह उद्योजकांना फसवणूक केल्याची माहिती मिळत आहे. यामुळे हे मोठे रॅकेट आहे का, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.