Subodh Mohite | माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते (Subodh Mohite) यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. पुण्यात हा प्रवेश सोहळा पार पडला.
शिवसेना व भाजपने प्रवेश नाकारल्याने स्वाभिमानी शेतकरी पक्षात त्यांनी प्रवेश केला होता. आता त्यांनी स्वाभिमानीला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीसोबत घरोबा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांचा आज प्रवेश सोहळा झाला.
तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात सुबोध मोहिते हे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री होते. राजकारणात येण्यापूर्वी युतीच्या कार्यकाळात ते भाजपचे मंत्री महादेवराव शिवणकर यांचे स्वीय सहाय्यक होते. शिवसेनेने 1998 मध्ये त्यांना रामटेक मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली. यात ते काँग्रेसचे बनवारीलाल पुरोहित यांचा पराभव करून विजयी झाले. 1999 मध्ये पुन्हा त्यांनी श्रीकांत जिचकार यांचा पराभव केला. याच काळात अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय मंत्री झाले.
नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत सुबोध मोहिते यांनी राजीनामा दिला. खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांना प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्षपद व काँग्रेसचे प्रवक्तापदही दिले.
काँग्रेसने त्यांना रामटेक विधानसभेच्या दोनवेळा उमेदवारी दिली. या दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला.काँग्रेसमध्ये फारसे सक्रिय न राहिल्याने ते संघटनेतून बाहेर पडले. त्यांनी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी पक्षात प्रवेश केला होता.