माजी शिक्षक आमदार प्रभाकर संत यांचे निधन
अमजद खान |कल्याण: माजी शिक्षक आमदार प्रभाकर अनंत संत यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धपकाळाने आज सायंकाळी चार वाजता राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि एक मुलगी, नावतंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज रात्री कल्याणच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माजी आमदार संत हे कल्याण पश्चिमेतील लेले आळीत राहत होते. त्यांचा जन्म अहमदनगर येथील अकोले येथे झाला. शालेय शिक्षण घेतल्यावर त्यांनी बी. ए. एमएड.र्पयतचे शिक्षण घेतले होते. १९८२ ते १९८८ या कालावधी ते शिक्षण आमदार होते. शहरातील तसेच खेडय़ापाडय़ातील मुलांना शालेय शिक्षण घेता यावा यासाठी त्यांनी चंग बांधला होता. वर्षाला एक शाळा या प्रमाणो त्यांनी १२ वर्षात १२ शाळा सुरु केल्या होत्या.
एका तपात 12 शाळा सुरु करणारे ते एकमेव शिक्षक आमदार होते.कल्याणमध्ये अभिनव, नूतन, ज्ञानमंदिर या शाळा संत यांनी सुरु केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. तसेच पडघा, शहापूर याठिकाणीही शाळा सुरु केल्या. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. डोंबिवलीत कन्या शाळा संत यांनीच सुरु केली होती. कल्याण पंचक्रोशीत त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद रुजविण्याचे काम केले. त्यांना साहित्याशी आणि शिक्षणाशी फार जिव्हाळा आणि प्रेम होते. त्यासाठी ते शेवटच्या क्षणार्पयत कार्यरत होते. त्यांच्या निधनाने शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.