मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह फरार घोषित
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आले आहे. मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांना फरार घोषित केलं आहे. सिंह यांच्यासह रियाज भाटी आणि विनायक सिंह यांनाही फरार घोषित करण्यात आलं आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचेही गोरेगाव प्रकरणात आरोपी म्हणून नाव आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबईच्या गोरेगाव पोलिसांनी परमबीर सिंह, सचिन वाजे आणि काही स्थानिकांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार बिमल अग्रवाल यांनी दावा केला होता की सचिन वाझे यांच्यामार्फत मुंबईचे तत्कालीन माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना 9 लाख रुपये रोख आणि 2,12,000 रुपये किमतीचे दोन सॅमसंग फोल्ड-2 फोन दिले होते.तसेच मुंबईतील इतर रेस्टॉरंट आणि बुकींकडून पैसे उकळायचे, असा आरोपही माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंह व सचिन वाझे यांच्यावर हॉटेल चालकाने केला होता.
गोरेगावच्या एका प्रकरणात सिंह यांना गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात अनेक समन्स काढले होते. त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आले आहे. सिंह यांच्यासह रियाज भाटी आणि विनायक सिंग यांनाही फरार घोषित करण्यात आलं आहे.