माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा जेलमधील मुक्काम पुन्हा वाढला
कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी न्यायायलीन कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जेलमधील मुक्काम आणखीन वाढला आहे.अनिल देशमुखांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे अनिल देशमुखांना मोठा धक्का बसला आहे.
100 कोटींची वसुली आणि मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीने 2 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांना अटक केली होती. मुंबईच्या विशेष न्यायालयाने 18 जानेवारी रोजी त्यांची डिफॉल्ट याचिका फेटाळून लावली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपप्रकरणी देशमुखांना दिलासा मिळू शकला नाही. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेमार्फत डिसेंबर 2020 ते मार्च 2021 दरम्यान बारमालकांकडून खंडणी वसुली करण्यात आली आहे. हा पैसा वाझेने देशमुखांना दिला होता. देशमुखांनी या पैशाचा वापर आपल्या व्यवसायासाठी केल्याचा आरोप ईडीने लावलेला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती.