वनविभागाची मोठी कारवाई, बिबट्याच्या चामड्याची तस्करी करताना चौघांना अटक
भुपेश बारंगे, वर्धा | वर्ध्यात बिबट्याच्या चामड्याची तस्करी करताना चौघांना रंगेहात पकडले, वर्धा वन विभागाने ही कारवाई केली आहे, त्यांच्याकडून बिबट्याचे संपूर्ण चामडे जप्त करण्यात आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. यात एक जण फरार झाला आहे.
वर्धा शहराच्या मुख्य बाजारपेठ येथील महादेवपुरा येथे आंबेडकर उद्यानजवळ बिबट्याच्या चामड्याची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. मध्यरात्री वनविभागाने सापळा रचून तस्करी होताना आरोपींना रंगेहात पकडले. बिबट्याच्या चामड्याचा 30 कोटी रुपयात सौदा झाल्याची माहिती आहे. बिबट्याच्या चामड्याच्या तस्करीत एकूण 4 जणांना ताब्यात घेण्यात आले. एक आरोपी फरार असल्याची वनविभागाने सांगितले आहे. बिबट्याच्या चांमड्यांची तस्करी प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. तस्करी प्रकरणात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.