सोनुर्ली - रोणापाल हद्दीवर घनदाट जंगलात विदेशी महिला सापडली जखमी अवस्थेत!
सावंतवाडी तालुक्यातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सावंतवाडी तालुक्यात सोनुर्ली - रोणापाल हद्दीवरील घनदाट जंगल परिसरात निर्जनस्थळी एक विदेशी महिला झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. ती तीन-चार दिवस उपाशी असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान तिला बांधून ठेवल्याने पायाला जखम झाली आहे. ती इंग्रजी भाषेत बोलत आहे. त्यामुळे ती अमेरिकेतील असावी आणि तामिळनाडूमधील नवरा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. त्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या पतीने तिला जंगलात आणून बांधले.
सोनुर्ली रोणापाल हद्दीवर ही महिला एका गुराख्याच्या निदर्शनास आली. त्यानंतर याबाबत पोलीसांना माहिती देताच पोलीसांनी घटनास्थळी येत बांधून ठेवल्या साखळदंडातून सुटका करून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथून तिच्यावर ओरोस जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी नेण्यात आले आहे.